"समाजात दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे."
- प्रदीप पराडकर यांचे रोह्यात प्रतिपादन
जनकल्याण समितीच्या सेवारथ यात्रेचे रोह्यात समारोप
रोहा- प्रतिनिधी
"समर्पित भावनेने लोकोपयोगी आणि सेवाभावी कार्य केले गेले पाहिजे, समाजातील दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे", असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांनी रोहा येथे केले.जनकल्याण समितीतर्फे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सेवारथ यात्रेचे समारोप रोह्यात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
गेली सात दिवस पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आणि पाच हजार लोकांपर्यंत भेटी देऊन रोह्यात परतलेल्या सेवारथ यात्रेचे समारोप मंगळवारी सायंकाळी मातोश्री मंगल कार्यालयात झाले.
यावेळी व्यासपीठावर जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर, मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोंकणचे कार्यवाह अविनाश धाट, रायगड जिल्हा संघ चालक किसन घाग, समितीचे जिल्हाध्यक्ष जयेश छेडा आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप पराडकर बोलत होते. त्यांनी पन्नास वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संस्कार, कृषी, पर्यावरण, स्वावलंबन, पूर्वांचल विकास, आपत्ती विमोचन आदी विषयांमध्ये समर्पित कार्य सुरू आहेत, आपत्ती विमोचनासाठी पन्नास वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या यासमितीचे स्थायी काम उभे राहिले, असे सांगताना 1993 सालचा लातूर येथील भुकंपासह केरळ, कोल्हापूर, सांगली, चिपळूण आणि महाड येथील महापुराच्यावेळी समितीच्या माध्यमातून केलेल्या मदतीचा आढावा घेतला.
त्याचबरोबर कोरोना काळात भयावह परिस्थितीत जनकल्याण समितीने राज्यभरातील दोनशे केंद्रातून केलेल्या रुग्णसेवेची माहिती विषद केली.
यावेळी रायगडचे अध्यक्ष जयेश छेडा यांनी प्रस्तावित केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, अविनाश धाट, किसन घाग यांनीही मनोगत व्यक्त केले. सेवारथ यात्रेच्या समारोप प्रसंगी प्रेरणा मुकबधीर सामाजिक संस्थेच्या सौ.आठवले मॅडम, प्राणीमित्र कुमार देशपांडे, डॉ. शिरीषकुमार पेंडसे, ज्येष्ठ मुरलीधर गिंडी, वत्सराज सर आणि मोरेश्वर लिमये यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीनिवास साठे, पुरुषोत्तम कुंटे यांनी सेवारथ यात्रे दरम्यान आलेले अनुभव मांडले. निधी प्रमुख गिरीश पेंडसे, ऍड. धनंजय धारप, कोषाध्यक्ष श्रीपाद गिरधर, सौ.आरती पेंडसे, विष्णु जोशी, संजीव कवितके, भाजपा रोहे शहर अध्यक्ष यज्ञश भांड, मकरंद गोविलकर, आदींसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. पल्लवी दाते यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.अरुंधती पेंडसे यांनी केले. या कार्यक्रमाचे सामूहिक वंदे मातरम् ने समारोप करण्यात आले.
Comments
Post a Comment