"मैदान कुठलेही असो,त्याठिकाणी एकजुटीने राहायचं आणि जिंकायचं"-आ. आदित्य ठाकरे.
रोह्यात राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला सुरुवात,कुमार गटात पुणे तर मुली गटात ठाण्याची विजयी सलामी
कै.नथुराम पाटील क्रीडा नगरीतून
शहरी भागात खेळाची मैदाने सध्या आर्टीफिशियल बनली असली तरी मातीत खेळण्याची मजा वेगळी असून मातीचा सुगंधही वेगळा आहे.त्यामुळे मातीची मैदाने टिकली पाहिजेत.क्रिकेट या खेळाचा प्रसार झाला कारण या खेळाचे एडमिनिस्ट्रेशन गावोगावी आहे.गावातील मुले मुली या खेळात पुढे आली आणि आपण जगात क्रिकेट खेळात एक नंबर बनलो.
देशाला एकत्र आणण्याचे काम खेळ करतो. नेल्सन मंडेला यांनी फुटबॉल खेळाच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिका देश एकत्र आणला आणि देश स्वतंत्र झाला.
या स्पर्धेतून कुमार आणि मुलींची निवडचाचणी होणार आहे आणि या निवड चाचणीतून महाराष्ट्राच्या संघाचा झेंडा तुमच्या हातात येणार आहे.महाराष्ट्रासाठी मेडल आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे त्यामुळे मैदान कुठलेही असो,त्याठिकाणी एकजुटीने राहायचं आणि जिंकायचं असे आपल्या भाषणात क्रीडापटूंना सल्ला देताना शिवसेनेचे युवा सेना प्रमुख,आ.आदित्य ठाकरे म्हणाले.
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रोह्यात धाटाव येथील प.पू.पांडुरंगशास्त्री आठवले व एम.बी.मोरे फांउंडेशन विद्यालयाच्या कै.नथुराम भाऊ पाटील क्रिडानगरी येथे ४ दिवसीय आयोजित ४८व्या कुमार -मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्यभरातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देताना ते बोलत होते.यासमयी रायगड खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार अनिकेत तटकरे,माजि मंत्री,आ.आदिती तटकरे,उद्योजक पूनित बालन,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,खो खो असो. महाराष्ट्र सरचिटणीस ॲड गोविंद शर्मा,उपाध्यक्ष विजय मोरे,रा.जिल्हा चिटणीस सुरेश मगर,खो.खो.असो.तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर,अलंकार कोठेकर,जिल्हा सचिव आशीष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रोत्साहनपर भाषणात ठाकरे पुढे म्हणाले की,मी मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे.अशी मोठी स्पर्धा भरवताना येणाऱ्या मोठ्या जबाबदारीची मला जाणीव आहे.मैदानी खेळासाठी गावागावातून मुलं-मुली येथे येतात, त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अनिकेत तटकरे यांचे कौतुक करीत एका मैदानी खेळासाठी मला रोह्यात बोलवलेत,मी आज महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मातीसाठी चांगले करण्याच्या भावनेतून इथे आलो आहे.महाराष्ट्र काय आहे हे राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवून दाखवून द्या असे आवाहन करीत सर्व स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नेतृत्व कोण करणार हे पहायला मिळणार आहे याचा मनापासून आनंद असल्याचे माजी मंत्री,आ.अदिती तटकरे यांनी मत व्यक्त केले.तर आपल्या प्रास्ताविकात लाल मातीतल्या खो खो खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या माध्यमातून ही राज्यस्तरीय स्पर्धा भरविण्यासाठी एक आयोजक म्हणून आम्हाला संधी मिळाली याचा मला निश्चितच अभिमान आहे असे आ.अनिकेत तटकरे म्हणाले.उद्योजक पुनीत बालन,गोविंद शर्मा यांनीही याठिकाणी आपली मते मांडली.
याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.स्पर्धेसाठी धवजसंचलन झाल्यानंतर ज्योत प्रज्वलित करण्यात आली.आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध विभागांतील आलेल्या संघांचे व पोलीस प्रशासनचे संचलन करण्यात आले.याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने खेळाडूंचे मनोरंजन सुद्धा झाल्याचे दिसून आले. या स्पर्धेसाठी राज्यातील ४८ संघ आणि नऊशेहून अधिक खेळाडू, मार्गदर्शक,प्रशिक्षक व संघटनेचे पदाधिकारी रोह्यात दाखल झाले असल्याने रायगडकरांना खो-खोच्या वेगवान खेळाची मजा लुटता येणार आहे.
सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या कुमार गटात पुण्याने जालन्याचा २२-८ असा एक डाव १४ गुणांनी पराभव केला.तर पुण्यातर्फे दिनेश म्हस्कर,विनायक शिंगाडे यांनी चांगला खेळ करत पुण्याला मोठा विजय मिळवून दिला.मुली गटात ठाण्याने बीडवर १९ ९ असा एक डाव १० गुणांनी विजय मिळवला. ठाण्याच्या धनश्री कंक, प्रीती बालगरे,कल्याणी कंक यांनी बहारदार कामगिरी केल्याचे पहावयास मिळाले.
याठिकाणी क्रीडापट्टूसह,प्रशिक्षक,मार्गदर्शक यांची निवासव्यवस्था,जेवण व्यवस्था,वाहतूक व्यवस्था उत्तमरीत्या करण्यात आली आहे तर या स्पर्धेचे उत्तम संयोजन करण्यात आल्याने संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत.
Comments
Post a Comment